आईचे दागिने आणि कैरीचं लोणचं

आईच्या हातचं कैरीचं लोणचं हा माझा आवडता पदार्थ. गरम गरम पोळी आणि कैरीचं लोणचं हा आता अतिशय आवडता बेत. उन्हाळ्याच्या दिवसात आई चटपटीत लोणचं नेहेमीच घालायची. येता जाता ताज्या ताज्या लोणच्याचा वास हुंगून बघायचा हा आम्हा बहिणींचा उद्योग.

मग आई विचारात असे ,” काय कसा येतोय वास? खमंग येतोय ना? अहाहा लोणचं म्हणलं की तो वास लग्गेच नाकात घोळतो. आम्ही थोडसं बोटानी चाखून बघत “आई, मस्त झालय ग ” असं म्हणत आईला दाद द्यायचो. आई म्हणे ,” एक दोन दिवसात मुरेलच मग बरण्यांमध्ये भरून ठेवीन.”
दागिना हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आईचे पारंपरिक दागिने बघत रमून जायचे. नथ, चिंचपेटी, गुलाब हार, ठुशी ही नावं लहानपणापासून पाठ होती.
तर गम्मत अशी झाली की एकदा ह्या कैरीच्या लोणच्याचा आणि दागिन्यांचा एक वेगळाच प्रसंग जुळून आला.
माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. मुहूर्त नऊ मे. अगदी कडकडीत उन्हाळ्यात. आमरस, ताक, मोगऱ्याचे गजरे, कैरीचं लोणचं ह्याशिवाय कसं काय लग्न होणार. हे तर सर्व असणारच होतं. घरात खरेदी, खाण्यापिण्याची तयारी,साड्या,दागिने सगळी लगबग चालू झाली.
एकदा दुपारी ताई बरोबर खरेदी करून आले तर घरात भला मोठा कैऱ्यांचा ढीग. प्रश्नार्थक नजरेनी आईकडे बघतो तर आईच्या चेहऱ्यावरूनच कळल की आता ही लोणच्याचा घाट घालणार. खरेदी ठेवायला आत गेलो तर पलंगावर दागिन्यांची पिशवी दिसली. मी पिशवी उघडून बसणार तोच आई आत आली. म्हणते कशी ,” मी घरात एक स्पर्धा आयोजित केली आहे. लोणचं करायला जो कोण जास्तीत जास्त मदत करेल त्याला दागिन्यांची पिशवी पहिली मिळेल. कैऱ्या चिरून दिल्या तर आजीची चिंचपेटी. खार केला तर तोडे, बरणीत भरलं तर नथ.” असं म्हणत स्वतःच हसायला लागली. मला माहिती होतं की आमची मदत मिळावी म्हणून हे सर्व चालू आहे पण मी जरा पट्कनच म्हणाले,”अगं कशाला? मीच करते की सगळं लोणचं, मग हवं ते उचलीन मी ह्या पिशवीतून.” नंतर वाटलं अरे बापरे कैऱ्या चिरण्याशिवाय येतं काय आपल्याला. आपोआपच दाताखाली जीभ चावली गेली. आई गालातल्या गालात हसत होती. मनात म्हणत असेल ,’कसं फसवलं’
तर मग झालं असं की मी बसले कैऱ्या चिरायला. नाही म्हणजे, बाकीच्यांनी केली मला मदत म्हणून तीन चार तासात कैऱ्या चिरून झाल्या. नाहीतर माझ्याकमाचा उरका बघता तीन चार दिवस लागले असते. खार करण्यासाठी आईच्या लांबून सूचना चालू झाल्या. तेल, मोहरी डाळ, लाल तिखट, हिंग, मेथी दाणे पावडर… मी सगळं पटापट करत गेले आणि झाला की खमंग वासाचा खार. अगदी आईसारखा. मी खूष. ‘अरे व्वा आपल्याला पण येतं की करता’ असाच काहीतरी विचार मनामध्ये नाचत होता. लोणचं अगदी छान मुरलं. बरण्यांमध्ये सुद्धा मीच भरलं.
पाहुणे आले. लगीनघाई चालू झाली. रोज नवनवीन खाण्याचे पदार्थ. जोडीला लोणचं मात्र रोजच. सर्वाना फारच आवडलं. चाखत माखत सगळ्यांनी खाल्लं.
लग्नाच्या दिवशी आईनी दागिन्यांची पिशवी माझ्यासमोर रिकामी केली. “अगं बाळा तू मदत नसती केलीस ना तरीही ही पिशवी तुझ्यासमोर अशीच ठेवली असती बघ मी. लोणच्याची आपली जरा गंम्मत.” मी म्हणाले,”आई ह्याच्यामुळेच शिकले मी लोणचं घालायला. आता कधी विसरणार नाही.” सगळ्या दागिन्यांचा खजिना होता माझ्या समोर. उचलले मला पाहिजे ते आणि मिरवले ठसक्यात. नथ,चिंचपेटी, बकुळ हार, तोडे …. किती धमाल आली ताईच्या लग्नात.
त्यानंतर आजपर्यंत मी लोणचं काही घातलं नाही. मिळतं ना आईच्या हातचं मग मी आळस करते. दागिन्यांच आणि माझं नात मात्र अजूनच घट्ट झालंय. दागिने आता रोजच बघते. कुठेही जाताना तसेच ठसक्यात मिरवते. तितक्याच प्रेमानी!!!!!

मुग्धा पोफळे-कासखेडीकर