marathi-bhasha-divas

२७ फेब्रुवारी…. मराठी भाषा दिवस हा आपण नुकताच साजरा केला. मराठी रंगभूमीवरच्या सिंहासनावर विराजमान झालेलं एक थोर व्यक्तिमत्व, दिगग्ज मराठी लेखक आणि कवी कुसुमाग्रज ह्यांचा हा जन्मदिवस. ह्या थोर कवीला भेटण्याचा योग मला आला त्याची ही छोटीशी आठवण.

साल साधारण १९९५. मी आठवीत होते. काही कामानिमित्त आई वडिलांसोबत नाशिकला गेले होते. सोबत आईची मैत्रीण होती. काही कारणांस्तव त्यांची आणि कुसुमाग्रजांची ओळख. संध्याकाळी आमच्याकडे वेळ होता तेव्हा काय करावं असं विचार आम्ही करत होतो. नाशिकमध्ये बघण्यासारखं बरच काही आहे. तेवढ्यात त्या पटकन म्हणाल्या ,’चला आपण तात्यांना भेटायला जाऊ.’ मला म्हणाल्या ,’ काय आवडेल का तुला कुसुमाग्रजांना भेटायला?’ मी नाही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आम्ही लगेच तयार झालो.  त्यांच्या नाशिकमधल्या बंगल्यावर पोचलो. पाचच मिनिटं बाहेर बसलो असू … कुसुमाग्रज बाहेर आले. वार्धक्याने शरीर जरी थकलं होतं तरी मन मात्र टवटवीत.

माझी ओळख करून दिल्यावर मी म्हणाले ,’ तुमच्या कविता आम्हाला मराठीत असतात’ ह्या वाक्यावर हसून म्हणाले,’ म्हण बरं माझी एखादी तुला आवडणारी कविता.
मराठी माध्यमातून शिक्षण घेत असल्यामुळे कुसुमाग्रजांच्या कविता अभ्यासात होत्याच. ‘कणा’ ‘आवडतो मज’ ‘माझे जगणे’ इ. कविता तोंडपाठ होत्या.

मी लगेच कणा म्हणायला सुरवात केली. पूर्ण म्हणून दाखवली. शेवटच्या ‘फक्त लढ म्हणा’ ह्या शब्दांमध्ये त्यांनी पण आपले शब्द मिसळले आणि पुढे म्हणाले “अरे वा, खूप छान. आता कितवीत तू? ” मी म्हणाले ” आठवीत” त्यावर “खूप शिकून मोठी हो” असं म्हणले आणि त्यानंतर आई आणि काकुशी बऱ्याच वेळा बोलले. त्यावेळी मी खूप लोकांच्या स्वाक्षऱ्या घ्यायचे. त्यांच्यापुढेसुद्धा पेपर पेन धरला. त्यांनी स्वाक्षरी दिली. त्यांना नमस्कार करून आम्ही निघालो.

ह्या भेटीतून मी काय शिकले तर एक व्यक्ती जी आपल्या साहित्यिक लिखाणानी इतकी मोठी झाली की तिचे नाव एका ताऱ्याला दिले गेले ती स्वतः मात्र अतिशय साधी होती. कुसुमाग्रजांच्या बोलण्यात वागण्यात कुठेही अहंपणा नव्हता…. कुठेही मीपणा नव्हता. अतिशय प्रेमानी ते सर्वांची चौकशी करत होते.
मराठी साहित्यातला सरताज ज्याला भेटायची संधी इतक्या सहजासहजी आपल्याला चालून आली हेच जरा पचायला वेळ गेला आणि भेट झाल्यानंतर मी जशी मी पूर्णतः भारावलेले होते तशीच आजही आहे. स्वाक्षरीचा कागद आता २६ वर्षानंतर  जुना झाला असेल पण माझ्या मनातल्या त्या भेटीच्या आठवणी कायम ताज्या राहतील.