कालच जागतिक महिला दिन झाला.
मी आमच्या कंपनी मधल्या मुलींबरोबर साजरा करण्याचा ठरवला. आमची कंपनी उरवडे गावात आहे. त्या गावातल्या काही मुली आमच्याकडे आहेत. त्यांना मी निरोप पाठवला होता की मी फक्त तुमच्यासोबत गप्पा मारायला येत आहे.
त्याप्रमाणे काल मी तिकडे पोचले. जाता जाता भुगाव मधील आमचा वोचमन मुलीच्या लग्नाकरता निघाला होता त्याला भेटून कंपनीत पोचले.
मुलींबरोबर गप्पागोष्टी सुरू झाल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्यांना एक प्रसंग सांगितला.
मी म्हणाले “आत्ता मी आमच्या वोचमन ला भेटून आले. मुलीचं लग्न करतोय. 12वी ची परीक्षा सुद्धा दिली नाही अजून. 3 दिवस जेवली नाही. रडत होती. पुढे शिकायचं आहे म्हणत होती. मी त्याला म्हंटल ‘बाबा रे, तुझ्या पाया पडते पण तिला परीक्षा देऊ देत.’ तो म्हणाला,’काय करू ताई. आमचा समाज असाच आहे. मुलगी म्हणजे ओझं. लौकर कमी करायचं. जास्त शिकवलं तर कोण लग्न करणार. पुण्यासारखं तिथे नाही. पण मी तिला परीक्षेसाठी आणणार आहे.’ नशीब माझं असं म्हणून मी इकडे आले. वरतून हुंड्यासाठी पैसे घेऊन गेला आहे.” हा प्रसंग मी सांगून थांबले.
मला का कोण जाणे असं डोक्यात सुद्धा आलं नाही की ह्या मुलींना त्यात काही वेगळं वाटत नसणार.
त्यातल्या चौघीजणी एकसाथ म्हणल्या ,” मॅडम, आमच्या बाबतीत हे असच झालं आहे. आम्हाला फक्त 9वी /10वी करू दिली. गावाकडे असच असतं. कोणी आमचं ऐकलं नाही. सासरचे म्हणले लग्न झाल्यावर शिकू देऊ. लग्न झाल्यावर म्हणाले तुम्ही शिकलात तर शेती कोण बघणार?” मुलींचे डोळे पाणावलेले होते. ह्या सर्व मुलीची वयं 27 आणि 28 अशी होती.
माझ्या अंगावर काटा आला. डोळ्यात नकळत पाणी आलं. मी त्यांना म्हणाले,” जे तुमच्या बाबतीत झालं ते तुमच्या मुलींच्या बाबतीत होऊ देऊ नका.” त्या म्हणाल्या नाही. आम्ही असं होऊ देणार.”
घरी परत येताना माझ्या मनात सतत हाच विषय होता. ह्यांच तरी कोण ऐकणार? ‘समाज’ हा एक इतका खोलवर रुतलेला विषय आहे की सगळ्यांचा विरोध स्वीकारून चालीरीती मोडून पुढे जाणारा विरळाच. हे ह्या मुलींना तरी कसं जमेल? त्यांच्या मुलींच्या बाबतीत असच होईल का?
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण नक्की काय साजरे करतो आहोत? असा प्रश्न मनात आला.
जेव्हा ह्या गोष्टी बदलतील. प्रत्येक मुलीला आई वडील शिकू देतील त्यावेळी प्रत्येक दिवस हा महिला दिवस असेल. तोपर्यंत आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण महिला दिवस साजरा करू.